केंद्राकडे भरपूर साठा, पण एकाही राज्याने केंद्राकडे व्हेंटिलेटरची मागणी केली नाही

0
385

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) : केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर आहेत. पण एकाही राज्याने केंद्राकडे व्हेंटिलेटरची मागणी केली नाही, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी एम्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. लोक अजूनही कोरोना संसर्गामुळे गंभीर नाहीत. निष्काळजीपणे वागत आहेत. केंद्र सरकारकडे व्हेंटिलेटर आहेत. मात्र, कोणत्याही राज्य सरकारने आमच्याकडे व्हेंटिलेटरची मागणी केलेली नाही. बहुतेक राज्य सरकारांना आम्ही व्हेंटिलेटर दिले आहेत. त्यांनीही अजूनपर्यंत त्याचा वापर केलेला नाही. त्यांच्याकडे व्हेंटिलेटर लावण्यासाठी जागाच नाही, असं सांगतानाच कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. आता पुष्कळ अनुभव आला आहे. सामानही पुरेसं आहे आणि टेस्टिंगची सुविधाही पुरेशी आहे, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच रुग्णालये भरून जात असून बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे आम्ही सिस्टिममध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला संयम आणि साहसाने काम केलं पाहिजे, असं सांगतानाच डॉक्टर परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी थ्री-टीवर भर देण्याचं आवाहन सर्व राज्यांना केलं. टेस्टिंग, ट्रेकिंग आणि ट्रिटींग या तीन गोष्टी विसरू नका. प्रत्येक देशवासियांनी या थ्री-टीला गांभीर्याने घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. आता सरकारकडे कोरोनाचा एक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी आपण पूर्वीपेक्षा आता अधिक सज्ज आहोत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सकारात्मक वातावरण देणं गरजेचं आहे. त्यासाठी सातत अॅलर्ट राहा, असं त्यांनी सांगितलं.