कॅनडामध्ये विमान कोसळून मुंबईच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकसह तीन मृत्यू

0
173

ओटावा, दि. ७ (पीसीबी) : कॅनडामध्ये विमान कोसळून दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईचे रहिवासी आहेत. अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावं आहेत.ब्रिटिश कोलंबिया प्रांतात येणाऱ्या व्हँकूअरपासून १०० किलोमीटरवर विमानाला अपघात झाला. अपघातग्रस्त विमान आकारानं लहान आहे. विमानतळाजवळ असलेल्या मॉटेलच्या (हायवेवरील हॉटेल) परिसरात विमान कोसळलं. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. अपघाताची माहिती दोघांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अपघातग्रस्त विमान वजनानं हलकं होतं. ते झाडाझुडूपांमध्ये कोसळलं. अपघातानंतर कॅनडाच्या परिवहन सुरक्षा बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे. पाच रुग्णवाहिका आणि एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. परिस्थितीत नियंत्रणात आहे. परिसरातील कोणालाही इजा झालेली नाही. घटनास्थळी दोन हवाई रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या. पण नंतर त्यांना माघारी बोलावण्यात आलं.