कार्यक्रमाच्या बहाण्याने भांडी पळवणारी टोळी सक्रीय

0
209
  • भोसरी, दिघी, देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

भोसरी, दि. ४ मार्च (पीसीबी) – आमच्या लहान मुलाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वयंपाकासाठी भांडी हवी असल्याचे कारण सांगत भांडी नेऊन ती परत न करता त्याचा अपहार करणारी टोळी पिंपरी-चिंचवड शहरात सक्रीय झाली आहे. या टोळीने शहराच्या विविध भागातून भांडी नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भोसरी, दिघी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

भोसरी पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद सूर्यवंशी, किरण देवाराम चौधरी, रवी पवार आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी डोळसवस्ती येथील उज्वल मंगलकेंद्र येथून 61 हजार 660 रुपयांची अॅल्युमिनियमची भांडी नेली. त्या भांड्यांचा आरोपींनी अपहार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

संदीप अर्जुन सोनवणे (वय 54, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद लक्ष्मण सूर्यवंशी उर्फ चैतन्य पांडुरंग चौधर (वय 21, रा. पाथर्डी, अहमदनगर), तुळशीराम निवृत्ती फुंडे (वय 64, रा. पाथर्डी, अहमदनगर) आणि एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी फिर्यादी सोनवणे यांच्या अक्षदा मंगल केंद्र या दुकानातून 39 हजार 780 रुपये किमतीची अॅल्युमिनियमची भांडी नेली. 24 तासात भांडी परत आणून देण्याच्या अटीवर नेलेली भांडणी आठ दिवसानंतर देखील परत आणली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

विनोद लक्ष्मण सूर्यवंशी (वय 21, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या मंगल केंद्र दुकानातून आरोपीने खोटे नाव सांगून लहान मुलाचा वाढदिवस असल्याचे कारण सांगत दुकानातून अॅल्युमिनियमची भांडी नेली. ती भांडी परत न करता 36 हजार 700 रुपये किमतीच्या भांड्यांचा अपहार केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.