काँग्रेस विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटला

0
417

नांदेड, दि. ७ :(पीसीबी) : नांदेड वरून पंजाबला परतलेल्या भाविकांपैकी ८०० पेक्षा जास्त जण कोरोना पॉझिटिव असल्याची धक्कादायक बाब चाचणीतून समोर आल्यानंतर पंजाब कॉंग्रेस विरुद्ध महाराष्ट्र कॉंग्रेस असा संघर्ष पेटला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंग व आरोग्य मंत्री बलबीर सिंग यांनी महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे पंजाब मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा आरोप केला. ” भाविकांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारने पाठविलेल्या बसेसच्या ड्रायव्हरपैकी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे व त्यांच्या मुळेच भाविकांना कोरोनाची लागण झाली असावी ” असे कॉंग्रेस नेते व सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. परंतु पंजाबच्या वाहतूक मंत्री राझीया सुलतान यांनी ” माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दिशाभूल करणारे विधान करत असून त्यांनी सत्यता तपासावी ” असे सडेतोड उत्तर दिले.

लॉकडाऊनमुळे नांदेड येथील श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे पंजाब राज्यातील ३५०० पेक्षा जास्त भक्त अडकले. पंजाब सरकारने ८० विशेष बसेसची व्यवस्था करून या भक्तांना परत नेले व ७०० भाविक खाजगी वाहनांने परतले. नांदेडमधून परतलेल्या भाविकांपैकी आत्तापर्यंत ८०० पेक्षा कास्त जण कोरोना पॉझिटिव असल्याची धक्कादायक बाब चाचणीतून समोर आली. त्यानंतर पंजाब व महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.

“महाराष्ट्र सरकार आमच्याशी खोटे बोलले”,असा खळबळजनक आरोप पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंग यांनी केला. तसेच महाराष्ट्राच्या निष्काळजीपणामुळे पंजाबला कोरोनाचा फटका बसला आहे, असे पत्रच पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग यांनी महाराष्ट्र सरकारला लिहिले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंजाब सरकारचे आरोप फेटाळून लावले. “महाराष्ट्रात असे पर्यंत त्या भाविकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती, त्यांना नेण्यासाठी आलेल्या बसेसच्या ड्रायव्हरना कोरोनाची लागण झाली असावी व त्यांच्यामुळेच पंजाबला परतणाऱ्या भाविकांना कोरोना झाला असावा “, असे विधान चव्हाणांनी केले. परंतु महाराष्ट्राचे मंत्री अशोक चव्हाण यांचे विधान दिशाभूल करणारे असून त्यांनी सत्यता पडताळावी, असे पंजाबच्या मंत्री रझिया सुलतान सांनी सांगितले. पंजाब मध्ये कॉंग्रेसची सत्ता असून महाराष्ट्रात कॉंग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना विकास आघाडीची सत्ता आहे. नांदेड भाविकांच्या प्रकरणावरून पंजाब कॉंग्रेस विरुद्ध महाराष्ट्र कॉंग्रेस असा संघर्ष पेटला आहे.