काँग्रेस मनसेला महाघाडीत घेण्यात तयार; पण राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातून जागा देण्याची अट

0
598

मुंबई, दि. १ (पीसीबी) – काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीच्या जागा वाटपाचा नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना हातकणंगलेसह आणखी एक मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा देण्यास हरकत नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने काँग्रेसने महाआघाडीच्या जागा वाटपात नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आधी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमामी शेतकरी संघटनेला केवळ एकच जागा देण्याची तयारी दाखवलेल्या काँग्रेसने आता आणखी एक मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविली आहे.

त्याचप्रमाणे महाआघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणतेही स्थान नसल्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने आता यू टर्न घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कोट्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक जागा दिल्यास हरकत नसल्याचे काँग्रेसने म्हटल्याचे समजते.

त्याचप्रमाणे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस महाआघाडीत १४ जागांची मागणी केली आहे. परंतु, काँग्रेसने चार जागा देण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे शुक्रवारी (दि. १) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे.