काँग्रेस प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

0
2737

जळगाव, दि. २७ (पीसीबी) –  भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री यांनी भाजप सोडण्याविषयी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेससह सर्वच पक्षाकडून मला प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे, मात्र, सध्या तरी कोणत्याही पक्षात जाण्यास आपली तयारी नाही. पक्ष बदलण्याचा कोणताही आपला उद्देशही नाही, असा खुलासा खडसे यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की,  माझ्या विधानांचा विपर्यास करण्यात आला आहे. मी काही  बोललो आहे, ते अर्धेच छापले  आहे. जळगावांतील कार्यक्रमात व्यासपीठावर असलेले काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांना  म्हणालो की, सध्या जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही, मात्र या विधानाकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे माझा कोणत्याही पक्षात जाण्याचा सध्या तरी विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

चाळीस वर्षे  एकाच पक्षाचे काम केले आहे. त्यामुळे आपण आता पक्ष सोडण्याचा विचारही करू शकत नाही. आम्ही अगोदर जनसंघाचे होतो, आता भाजपचे आहोत. त्यामुळे आमच्यावर शिक्का बदलला आहे. ज्याने गेली चाळीस वर्षे एकाच पक्षाचे नेतृत्व केले आहे, ती व्यक्ती आपल्याकडे असावी असे प्रत्येक पक्षाला वाटते, असे खडसे म्हणाले.  दुसऱ्या पक्षात जाण्याची इच्छा असायला हवी.  त्यासाठी माझ्यावर बळजबरी  कोणीच करू शकत नाही,  असे खडसे म्हणाले.