काँग्रेससोबत युती नाही; प्रकाश आंबेडकरांचा स्वबळाचा नारा

0
365

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. आता काँग्रेससोबत चर्चेची दारे बंद झाली आहेत,  अशी घोषणा  वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवार) करून  स्वबळाचा नारा दिला.

मुंबईत आयोजित  पत्रकार परिषदेत आंबेडकर  बोलत होते.

आंबेडकर म्हणाले की, अनंत चतुर्दशीनंतर ‘वंचित’च्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. १४४-१४४ जागांचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसपुढे ठेवला होता. मात्र, त्यावर काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आता चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.  अन्य  इतर पक्ष येतील, त्यांना सोबत घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, भारिप बहुजन महासंघ व ‘एमआयएम’च्या वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. त्यामुळे वंचितला  सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केला होता.  मात्र, आंबेडकरांनी राष्ट्रवादीला वगळून काँग्रेससोबत युती करण्याचा आग्रह धरला होता.  तसेच त्यांनी  ५० टक्के जागांची मागणी काँग्रेसकडे केली होती. यावर   काँग्रेसने  प्रतिसाद  दिला नव्हता.