काँग्रेसला ४० जागा, वंचित आघाडीचा प्रस्ताव

0
345

मुंबई, दि ४ (पीसीबी) – महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकूण २८८ जागांपैकी केवळ ४० जागा सोडण्यात येतील, असा प्रस्ताव भारिप बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या ओवेसी बंधू यांच्या संयुक्त पुढाकाराने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने बुधवारी दिला. या प्रस्तावाबाबत १० दिवसांमध्ये काँग्रेसने निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीनाथ पडळकर यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिला. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर-ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांना आठ जागांवर विजयापासून रोखले होते. काँग्रेस महाआघाडीसोबत जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवून राजकीय उपद्रवमूल्य दाखवून दिले होते. त्याचा मोठा फटका राज्यात काँग्रेस महाआघाडीला बसला होता. परिणामी, काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी वंचित बहुजनशी जुळवून घेण्याचे संकेत नुकत्याच झालेल्या दिल्लीत बैठकीत दिले होते.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दादरच्या आंबेडकर भवनात बुधवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला केवळ ४० जागा सोडण्याची तयारी दाखविली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सचिव अरुण सावंत, पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक सोनोने उपस्थित होते.