काँग्रेसला धक्का; महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा काँग्रेसला रामराम

0
260

नवी दिल्ली, दि.१६ (पीसीबी) : काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यापूर्वी त्यांनी आपलं ट्विटर प्रोफाईलही बदललं होतं. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या माजी सदस्य म्हटलं होतं. आता त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याबाबतचं पत्र पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसचे सर्व नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत.

खरंत तर सुष्मिता देव यांनी जेव्हा आपलं ट्विटर प्रोफाईल बदललं तेव्हाच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर आता त्यांचा राजीनामाच समोर आला आहे. सुष्मिता देव यांचंही ट्विटर अकाऊंट काँग्रेसच्या अन्य नेत्यांसह ब्लॉक झालं होतं. काँग्रेसकडून त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राहुल गांधींनीही त्यावेळी केंद्रावर निशाणा साधला होता.