काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नकोत ? – अजित पवार

0
583

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेसने ताठर भूमिका घेऊ नये. काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नकोत?, असा तिरकस  सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

एका कार्यक्रमात  पवार बोलत होते. अजित पवार सुरूवातीपासून मनसेला आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक  आहेत. त्यांनी अनेकवेळा याबाबत भाष्य केले आहे. मनसेकडे शहरी भागात विशिष्ठ मतांचा गठ्ठा आहे. त्यामुळे पवार मनसेला आघाडीत घेण्यासाठी आग्रही आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाआघाडीमध्ये घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्नशील आहे. मात्र मनसेचा महाआघाडीत समावेश करण्यास काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मनसेला  महाआघाडीत घेतल्यास उत्तर भारतीयांमध्ये वेगळा संदेश जाईल. त्याचा काँग्रेसला फटका बसू शकतो, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनीही महाआघाडीमध्ये  सामील होण्याबाबत कोणतीही भूमिका  स्पष्ट केलेली नाही.