“काँग्रेसच्या मार्गाने गेलो असतो तर देशाने कधीच प्रगती केली नसती”

0
345

नवी दिल्ली,दि.६(पीसीबी) – काँग्रेसप्रमाणे आमची वाटचाल असती तर शत्रू संपत्ती कायदे बनले नसते, बेनामी संपत्ती कायदा लागू झाला नसता, चीफ ऑफ डिफेन्स नियुक्ती झाली नसती. आमच्या सरकारमुळे कारभाराला गती आली. आमच्या सरकारला गती आणि गुणवत्ता दोन्ही आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभाराचं भाषण लोकसभेत केलं. यावेळी मोदींनी राम मंदिरापासून, तिहेरी तलाकपर्यंत अनेक विषयांवरुन काँग्रेसला टोले लगावले. पंतप्रधानांचं भाषण सुरु होताच सत्ताधारी खासदारांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केली.

राहुल गांधींनी दिल्लीतील सभेत बोलताना, ६ महिन्यांनंतर देशातील तरुण मोदींच्या पाठीवर लाठ्या मारतील, असं म्हटलं होतं. त्याबाबत मोदी म्हणाले, “मी सुद्धा ठरवलं आहे की आता सूर्यनमस्कारांची संख्या वाढवावी. जेणेकरुन माझी पाठ लाठ्या झेलण्यासाठी आणखी मजबूत होईल. गेल्या २० वर्षांपासून शिव्या-शाप ऐकण्याची सवय झाली आहे. मी ३५ मिनिटांपासून बोलत आहे, पण आता करंट बसला. ट्यूबलाईट पेटायला वेळ लागतो” असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.