कल्याणमध्ये शिवसेनेच्या २६ नगरसेवकांचे सामूहिक राजीनामे

0
434

कल्याण , दि. १० (पीसीबी) – ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात  कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील  शिवसेनेच्या तब्बल २६ नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.  त्यांनी भाजपच्या विरोधात मैदानात उतरलेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांना पाठिंबा  दिला आहे. यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

कल्याण पूर्वचे  विद्यमान अपक्ष आमदार गणपत गायकवाड  भाजपमध्ये गेल्याने हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला. त्यामुळे शिवसेनेतून इच्छुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली. मात्र यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना युतीधर्म पाळण्याचे आदेश दिला. मात्र  २६ नगरसेवक आणि सुमारे ३०० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले.

आमच्यामुळे पक्षप्रमुखांना कमीपणा घ्यावा लागू नये, यासाठी हा निर्णय घेत  आहे, अशी प्रतिक्रिया    शिवसैनिकांनी दिली आहे. तसेच आम्ही पक्षप्रमुखांना कल्याण पूर्वेतून आमदार निवडून आणून भेट देऊ, अशीही भावना शिवसैनिकांनी  व्यक्त  केली आहे.