कर संकलन कार्यालयातून मालमत्तेच्या फाईल गायब झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करा : नगरसेवक विकास डोळस

0
212

– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन कार्यालयातून मालमत्तेच्या फाईल गायब झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील नोंद नसलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी आपल्या मिळकतींची नोंद केलेली नाही. त्यांच्या फाईल तयार केल्या आहेत. त्यापैकी काही फाईल पिंपरी येथील कर संकलन कार्यालयातून गायब झाल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब कर संकलन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
पिंपरी येथील करसंकलन कार्यालयातून १४ फाईल गायब झाल्या होत्या.

त्यापैकी ९ फाईल गोडावूनमध्ये मिळाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, संबंधित नागरिक सातत्याने कार्यालयात कर भरण्यासाठी येत आहेत. मात्र, फाईल न सापडल्यामुळे त्यांच्या मालमत्तेची नोंद करण्यात अडचणी येत असल्याची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात क्षेत्रीय कार्यालयामार्फत कर जमा केला जातो. पिंपरी येथील कर संकलन कार्यालयात नव्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे वास्तव आहे. कर्मचाऱ्यांच्या वादामध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी आणि फाईल गायब झाल्या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असेही नगरसेवक डोळस यांनी म्हटले आहे.