कर्जत ग्रामपंचायत निवडणुकीत ‘एवढ्या’ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या लागल्या हाती; रोहित पवार यांची सरशी

0
454

कर्जत, दि.१२ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार हे कर्जत तालुक्यातील पार पडलेल्या एकूण ५६ ग्रामपंचायत निवडणुकीत आपले स्थान प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेत. ५६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४७ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावत आमदार पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना धक्का दिला आहे, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी केला आहे.

“निवडणुकांचे निकाल लागताच राम शिंदे यांनी केलेला दावाही आता मोडीत निघाला आहे. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्वाचे लक्ष कर्जत-जामखेड मतदार संघाकडे लागले. भाजपाचे माजी मंत्री असलेल्या राम शिंदे यांना आमदार रोहित पवार हे सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेत शह देणार का ? अशी मतांतरे व्यक्त केली जात होती. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असणे ही मोठी राजकीय इभ्रत लोकप्रनिधींना असतेच. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतींना सर्वाधिक निधी मिळत असल्याने स्थानिक विकासात ग्रामपंचायतींचा मोठा वाटा असतो. त्यामुळे माजी मंत्री राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांच्यातच अप्रत्यक्ष रीत्या ही निवडणूक होती. त्यामुळे मोठी रस्सीखेच करत आ. रोहित पवारांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात असलेली सत्तास्थाने हळूहळू काबीज करत आपला बालेकिल्ला आणखी प्रबळ आणि घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, त्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आता तीच परिस्थिती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली आहे. आमदार रोहित पवारांनी मतदार संघात असलेल्या अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडत न्याय मिळवून दिला. कुकडी-सिनाचा पाणीप्रश्न, बस डेपो, भू-संपादन, रखडलेला पीक विमा आदी मोठय़ा प्रश्नांची सोडवणूक करत आपल्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्यातून शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून दिला,” अस शेवटी नितीन धांडे यांनी स्पष्ट सांगितले.