कंपनीतील अपघातात कामगाराचा मृत्यू; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

0
370

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – कंपनीतील कामाचा कोणताही अनुभव नसताना ते काम कामगारास करण्यास लावले. त्यामुळे अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाच जून रोजी एमआयडीसी भोसरी मधील पुना इंजिस्टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली.

विक्रम लोकबहादुर भूल असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत लोकबहादुर जयसिंग भूल (वय 50, रा. एमआयडीसी भोसरी. मुळ रा. नेपाळ) यांनी मंगळवारी (दि. 29) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनी मालक सोपान येवले आणि जयंत राणे यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मयत मुलगा पुना इंजिस्टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करत होता. पाच जून रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास कंपनीत एअर बेलो जॉब हा लिकेज आहे का, हे पाहण्यासाठी एअर प्रेशरने टायरमध्ये हवा भरत असताना क्लॅमपिंगचे बोल्ट स्लिप झाल्याने तो एअर बेलो जाॅब फिर्यादी यांच्या मुलाच्या तोंडाला, गळ्याला आणि कपाळाला लागला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने फिर्यादी यांच्या मुलाचा मृत्यू झाला. फिर्यादी यांच्या मुलाला त्या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. तरी देखील त्यास ते काम करण्यास लावले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.