औरंगाबाद मध्ये मृत्युंचे गूढ ; प्रशासनाचे दुर्लक्ष

0
431

औरंगाबाद, दि.१५ (पीसीबी) : देशामध्ये कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.  भारतात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या ९ हजार ५२२ इतकी झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असल्याने महाराष्ट्रात जास्त मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात मृत्यूचा आंकडा ३ हजार ९५० इतका आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ आता मराठवाड्यातील औरंगाबाद शहरामध्ये कोरोना बाधितांचे संख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २ हजार ७५६ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण असून त्यापैकी सुमारे १५० जणांचा मृत्यू झालेला आहे. मे महिन्यात औरंगाबाद मध्ये एकूण ९१५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  गेल्या वर्षी मे महिन्यात हेच प्रमाण केवळ ६४० इतके होते. अचानकपणे औरंगाबाद मध्ये एकट्या मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपटीने वाढलेल्या मृत्युंमुळे मृत्यूंच्या संख्या वाढीबद्दल गूढ निर्माण झाले आहे. मात्र, प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे.    

 

औरंगाबाद  जिल्ह्यातील १६ मार्चला कोरोणाचा पहिला रुग्ण सापडला होता. रशिया व कजाकस्थान येथे प्रवास करून आलेल्या ५९ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर औरंगाबाद मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ झाली. कालपर्यंत प्राप्त असलेल्या आकडेवारी नुसार औरंगाबाद मध्ये २ हजार ७५६ पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत औरंगाबादचा आता चौथा क्रमांक आहे. तसेच औरंगाबाद येथे कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. यावर्षी मे महिन्यात औरंगाबाद मध्ये कोरोना सहित इतर सर्व कारणांमुळे एकूण ९१५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी मे  महिन्यात हेच प्रमाण केवळ ६४० इतके होते. लॉकडाऊन असल्यामुळे याच काळात अपघातात मृत्यू झालेल्यांचे प्रमाण नगण्य होते. तरी देखील सुमारे ३०० जणांचा मृत्यू वाढला आहे. त्यातूनच अत्यंत गंभीरबाब समोर आली आहे. औरंगाबाद मध्ये अचानकपणे वाढलेल्या मृत्युंमुळे या मृत्यूंच्या कारणाबद्दल एक गूढ निर्माण झाले आहे.

 

कोरोणाचा संसर्ग मधुमेह, कॅन्सर, अस्थमा, उच्च रक्तदाब सारख्या इतर आजाराने ग्रस्त (कोमाॅर्बिड) असलेल्या रुग्णांना अधिक लवकर होतो. तसेच अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण देखील अधिक असते. मृत्यू झालेल्या लोकांना कोरोना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे, असेही तज्ञांचे  म्हणणे आहे. अशा लोकांचा तत्काळ  तपास करणे गरजेचे होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  मात्र प्रशासनाकडून या महत्वाच्या बाबीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे.