ओबीसी आरक्षणासाठी शिंदे सरकरा यावे लागले – चंद्रशेखर बावनकुळे

0
171

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : राज्यात ओबीसी आरक्षाणावरून राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. या आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने बांठिया अहवालानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यावर आता सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत असून ओबीसी नेते आणि माजीमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाची लढाई बऱ्यापैकी आम्ही जिंकलो आहोत. मात्र यासाठी उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार जावून एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार यावं लागलं. योग्य पद्धतीने हातळणी आणि चांगले वकील लावणे महत्त्वाचे होते. मी आधीच सांगितलं होत की, ओबीसी आरक्षण केवळ देवेंद्र फडणवीस मिळवून देऊ शकतात. तेच झालं. फडणवीसांनी आमच्यासोबत संघर्ष केल्यामुळे आरक्षण मिळाल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं.

8 जुलै रोजी राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायत पंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने या 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी पत्रकदेखील जारी केले होते. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.