ओबीसी आरक्षणावर भाजपाचा महाराष्ट्र शासनावर हल्ला बोल

0
482

चुकीच्या धोरणामुळे राज्यातील ओबीसी बांधव हक्कापासून वंचित – चंद्रशेखर बावनकुळे

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) : मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या निकालानंतर आता भाजपनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारवर टीका करताना चुकीच्या धोरणांमुळं राज्यातील ओबीसी बांधव हक्कांपासून वंचित असल्याचं म्हटलं आहे.

बावनकुळे म्हणाले, मध्य प्रदेश सरकारनं ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी चार महिन्यात यशस्वी प्रयत्न केले. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला १३ डिसेंबर २०१९ रोजी पहिला निर्णय दिला होता. तेव्हापासून चार महिन्यात महाराष्ट्र सरकारलाही हे करता आलं असतं. पण मी वारंवार सांगायचो की या सरकारमधील झारीतील शुक्राचार्य जे आहेत, त्यांना ओबीसीच्या जागेवर धनदांडग्या लोकांना निवडून आणायचं आहे, हा त्यांचा मनसुबा आहे. मंत्री मोडते घालत होते, मंत्रालयात काम चालू नव्हतं. कधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्यानं घेतलं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टानं वारंवार फटकारल्यानंतर कोर्टाला विश्वासच राहिला नाही की, हे राज्य सरकार ओबीसीच्या बाजूनं आहे. म्हणून शेवटी कोर्टानं महाराष्ट्रात निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

या सरकारने ओबीसी आयोगाला पैसा दिला नाही. पहिला आयोग रद्द केला नंतर दुसरा आयोग आणला. पुढे डेटा तयार केला नाही त्यामुळं केवळ आणि केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळं आणि ओबीसीविरोधी धोरणामुळं आरक्षण गेलं आहे. यांना आता जनता सोडणार नाही, अशा शब्दांत बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.