“ओबीसींबाबत भाजप – कॉंग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू”- देवेंद्र तायडे

0
388

ओबीसींनी भाजप – कॉंग्रेसला नाकारुन वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडावा…..देवेंद्र तायडे

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेनुसार दिलेले आरक्षणाचे हक्क ओबीसींना मिळाले पाहिजेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यासाठी ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यासाठी केंद्र सरकारने 24 सप्टेंबर रोजी प्रतिज्ञाव्दारे नकार दिला. 2011 च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी यासाठी भाजपाचे खासदार स्व. गोपीनाथ मुंडे यांनीही आंदोलन केले होते. आता केंद्रात भाजपाचे सरकार आहे तेही ओबीसींची जनगणना करण्यास स्पष्ट नकार देत आहे. अशी दुट्टपी भुमिका घेणा-या भाजपा आणि कॉंग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये मते देऊ नयेत. आता ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष सक्षम ठरु शकतो. ओबीसींनी भाजप – कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचून वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी केले.

24 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचा इम्पिरिकल डाटा देता येणार नाही असे प्रतिज्ञापत्र देऊन देशातील पन्नास टक्क्यांहून जास्त असणा-या ओबीसींची फसवणूक केली आहे. याबाबत ओबीसींमध्ये जनजागृती व्हावी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. 28 सप्टेंबर) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला शहराध्यक्षा लताताई रोकडे, माजी नगरसेवक व शहर कार्याध्यक्ष अंकुश कानडी, शहर उपाध्यक्ष अशोक कदम, सुनिल गायकवाड, शहर महासचिव संतोष जोगदंड, राजन नायर, बाबूराव फुलमाळी, इमामभाई शेख, के.डी. वाघमारे, धनंजय कांबळे, किरण हिंगणे, सुनिता शिंदे, स्वाती सपकाळ आदी उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी देवेंद्र तायडे म्हणाले की, या देशात वृक्षांची, प्राणी, पक्षांचीही गणना होते. मात्र घटनेने दिलेले आरक्षणाचे हक्क मिळू नयेत म्हणून भाजपा – कॉंग्रेस हे दोन्हीही राजकीय पक्ष ओबीसींना डावलत आहेत. आता ओबीसी समाजाने जागृत व्हावे आणि भाजपा – कॉंग्रेसच्या भुलथापांना बळी पडू नये. केंद्रात कॉंग्रेस सत्तेत असताना भाजपा ओबीसींची जनगणना करा म्हणून आंदोलन करीत होते. आता केंद्रात भाजपा सत्तेत असताना कॉंग्रेस आंदोलन करीत आहे. दोन्हीही पक्ष ओबीसींच्या मतांवर सत्ता मिळवतात. वेळ येताच ओबीसींना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्यासाठी राजकारण करतात. आता यांना सत्तेतून पायउतार करुन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाच पर्याय ओबीसींनी निवडावा असेही आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी केले.