ओबीसींबाबत निकाल लागेपर्यंत दोन ते तीन महिने निवडणुका लांबल्या तरी हरकत नाही

0
185

 उपमुख्यमंत्री अजित पवार

मुदत संपल्यानंतर आयुक्त महापालिका स्तरावर प्रशासक असतील

पुणे, दि. २७ (पीसीबी) – ओबीसींबाबत निकाल लागेपर्यंत दोन ते तीन महिने निवडणुका लांबल्या तरी हरकत नाही. निवडणुका लांबल्या म्हणून आभाळ कोसळत नाही. मुदत संपल्यानंतर महापालिका स्तरावर आयुक्त हेच प्रशासक राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ओबीसींबाबत सध्या निर्णय होणे गरजेचे आहे. राज्य सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहेच. मात्र निकाल लागला नसल्यानेच निवडणुका लांबणीवर पडत आहेत. निवडणुका लांबणीवर गेल्या तरी हरकत नाही. मात्र ओबीसी बांधवांवर अन्याय होता कामा नये ही राज्य सरकारची भूमिका आहे. पूर्वी 12 ते 13 वर्षे निवडणुका लांबल्या होत्या अशी आठवण उपमुख्यमंत्री पवार यांनी करून दिली. त्यानंतर बदल होऊन प्रत्येक 5 वर्षानंतर निवडणुका होऊ लागल्या. त्यामुळे 2 ते 3 महिने निवडणुका लांबल्या तर महापालिका स्तरावर आयुक्त, जिल्हा परिषद व नगरपरिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

नाराजांना कसे खुश करायचे माहीत आहे : पवार

महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. राज्यात सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार असताना देखील ही पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमकपणे उतरत नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना पवार म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मी निवडणुका लढवत आणि पाहत आहे. नाराज झालेल्यांना कसे खुश करायचे हे मला चांगलंच माहीत आहे. पक्षाच्या रणनीती जाहीरपणे न सांगता आम्ही त्या योग्य वेळी योग्य त्या ठरवू असे प्रतिपादन पवार यांनी केले.