ऑलिंपिक पात्रतेचे आव्हान स्पर्धेगणिक खडतर

0
221

नवी दिल्ली,दि.३१(पीसीबी) – कोरोना संसर्गाची भिती कमी झाली नसली, तरी यंदा ऑलिंपिक होणार यात शंका नाही. जपानने ऑलिंपिक घेण्यासाठी कंबर कसली आहे. विविध खेळाच्या ऑलिंपिक पात्रताही अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. यातीलच एक कुस्ती या खेळाच्या अखेरच्या दोन ऑलिंपिक पात्रता फेरी टप्प्यात आल्या आहेत. ऑलिंपिक खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे ऑलिंपिक वर्षात होणाऱ्या स्पर्धेत आव्हान अधिक वाढलेले असते आणि सर्व देशांचे प्रमुख मल्ल त्यासाठी पात्रता स्पर्धेत उतरत असतात. त्यामुळे सहाजिकच ऑलिंपिक पात्रतेचे आव्हान स्पर्धेगणिक खडतर होत असते.

करोनाच्या संकटकाळामुळे क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला. यातून सावरत आता क्रीडा क्षेत्र उभे राहत आहे. कुस्तीने देखील शून्यातून सुरवात केली आहे. सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून जागितक कुस्ती महासंघाने या वर्षी वैयक्तिक विश्वकरडंक स्पर्धा पार पाडली. आता ऑलिंपिक पात्रतेच्या अखेरच्या टप्प्याला त्यांनी सुरवात केली आहे. यातील एक फेरी ही आशियातील खेळाडूंसाठी राहणार आहे, तर दुसरी जागतिक पात्रता फेरी असेल. आशियातील खेळाडूंसाठी या फेरी महत्वाच्या ठरणार आहेत. म्हणजे आशियातील फेरीत अपयश आल्यास तो मल्ल अखेरच्या जागतिक फेरीतून आपले कौशल्य पणाला लावू शकेल.

ऑलिंपिक स्पर्धेसाठी फ्री-स्टाईल, ग्रिको रोमन आणि महिला या प्रकारात प्रत्येकी सहा असे १८ वजन गट असतील. या अठरा वजन गटातून एकूण २८८ कुस्तीगीर पात्र ठरणार आहेत. यामध्ये पुरुष गटासाठी ५५ किलो, ६०किलो, ६६ किलो, ७४ किलो, ८४ किलो, ९६ किलो आणि १२० किलो हे फ्री-स्टाईलसाठीचे वजन गट आहे. महिलांसाठी 50 किलो, 53 किलो, 57 किलो, 62 किलो , 68 किलो, 76 किलो या वजनगटांचा समावेश आहे. ग्रीको रोमनसाठी ६० किलो, ६७ किलो, ७७ किलो, ८७ किलो, ९७ किलो आणि १३० किलो अशा वजन गटांचा समावेश आहे.

प्रत्येक खंडानुसार पात्रता फेरीचे नियोजन केले जाते. पात्रता प्रत्येक विभागात होत असली, तरी त्याचे निकष आणि पात्रता संख्या ही ठरलेली असते. अशा विविध भागातून पात्रता फेरी झाल्यानंतर प्रत्येक वजन गटासाठी १६ कुस्तीगीर पात्र ठरतात. रचनेनुसार जागतिक स्पर्धेतून पात्र ठरण्याची सर्वात मोठी संधी कुस्तीगीरांना असते. जागतिक स्पर्धेतून प्रत्येक वजन गटातील पहिल्या सहा क्रमांकांच्या कुस्तीगीरांना पात्र होता येते. त्यानंतर प्रत्येक विभागानुसार होणाऱ्या पात्रता फेरीतून प्रत्येक वजनदगटातून पहिले दोन कुस्तीगीर पात्र ठरतात. टोकियोसाठी २०१९ मध्ये कझाकस्तान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेतून प्रत्येक वजन गटासाठी सहा खेळाडूंची पात्रता सिद्ध झाली आहे. बाकी आहे ती आशियाई पात्रता, आफ्रिका खंड पात्रता, युरोपिय पात्रता, अमेरिकन पात्रता आणि जागतिक पात्रता. यातील आता आशियातील कुस्तीगीरांसाठी पुढील महिन्यात ९ ते १८ एप्रिल दरम्यान अल्मटी येथे पात्रता फेरी होणार आहे.