ऑलिंपिक घेण्याची फ्लोरिडाची तयारी

0
195

मियामी, दि. 2८ (पीसीबी) – या वर्षी ऑलिंपिक स्पर्धा घेण्यास जपानने नकार दिल्यास त्याचे आयोजन करण्याची तयारी फ्लोरिडाने दाखवली आहे. तशा आशयाचे पत्र देखिल त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुख्य थॉमस बॅश यांना लिहिले आहे. फ्लोरिडाचे आर्थिक अधिकारी जिमी पॅट्रॉनिस यांनी हे वक्तव्य केले असून, २०२१ मध्ये देखिल जपान ऑलिंपिक घेण्यास तयार नसेल, तर तुम्हाला आम्ही निराश करणार नाही. जपानहून अमेरिकेत फ्लोरिडा येथे ही स्पर्धा घेण्याची आमची तयारी आहे, असे बॅश यांना त्यांनी कळविले आहे.

प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जपान या वर्षी देखिल ऑलिंपिक घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि संयोजन समिती कितीही स्पर्धा घेण्यास तयार असल्या तरी जपानमधील एक तृतियांश जनतेचा स्पर्धा घेण्यास विरोध आहे. याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत. पॅट्रॉनिस यांनी ऑलिंपिक समितीने त्यांनी केंद्र निश्चिती पथकातील पदाधिकाऱ्यांना फ्लोरिडात पाहणी करण्यासाठी पाठविण्याची अजूनही वेळ गेलेली नाही, असे देखिल स्पष्टपणे म्हटले आहे.

पॅट्रॉनिस यांनी आपल्या सहीने हे पत्र ऑन लाईन पद्धतीने बॅश यांना पाठवले आहे. करोनाच्या लसीकरणाची देखील आमची क्षमता मोठी आहे. येथील आर्थिक स्थितीही पूर्वपदावर येत आहे. क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे येथील डिस्ने वर्ल्ड देखिल सुरू झाले आहे, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

यानंतरही करोना संक्रमणाच्या काळात सर्वाधिक फटका फ्लोरिडाला बसल्याचे जाणकार म्हणत आहेत. या कालावधीत येथे २५ हजार लोक मृत झाल्याची नोंद आहे. हे जरी खरे असले, तरी आमची ऑलिंपिक स्पर्धा घेण्यासाठी जी म्हणून काही काळजी घ्यायची आवश्यकता आहे ती घेण्याची आमची तयारी आहे. ऑलिंपिक घेण्याची मान्यता मिळाल्यास आम्ही या आघाडीवर देखील यशस्वी होऊ, असे पॅट्रॉनिस यांचे म्हणणे आहे. दरम्यान, जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी जपान ही स्पर्धा सुरक्षित आणि आरोग्यदायी पद्धतीने घेण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.