ऑक्सीजन बेडची उपलब्धता वाढवा, खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावा – खासदार बारणे यांच्या आयुक्तांना सूचना

0
275

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन उपाययोजनांमध्ये वाढ करावी. पालिकेने ऑक्सीजन बेडची जास्तीत-जास्त उपलब्धता वाढवावी, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांची मनमानी थोपवा. रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेच्या अधिका-याची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आज (सोमवारी) भेट घेतली. शहरातील संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. कोरोना हॉटस्पॉट, त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत आयुक्तांना विविध सूचना दिल्या. यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थित होते. खासदार बारणे यांनी पालिकेच्या वॉररुमला देखील भेट देवून माहिती घेतली.

खासदार बारणे म्हणाले, मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज पाचशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. आजपर्यंत 11381 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिका आणि खासगी लॅबच्या मदतीने दररोज तीन हजार चाचण्या केल्या जातात. यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण झोपडपट्या, बैठ्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या भागात प्रभावी अपाययोजना कराव्यात. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. खासगी रुग्णालयात दाखविलेले बेड उपलब्ध नाहीत. याबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. रुग्णालयामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. डॉक्टर, नर्स, कर्मचा-यांची कमतरता आहे. पुण्यातील खासगी हॉस्पिटल अधिकचा पगार देतात. त्यामुळे शहरातील डॉक्टर, नर्स पुण्यात नोकरीला जातात अशी धक्कादायक माहितीही समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

जेवढ्या क्षमतेने बेड दाखविले आहेत त्यापेक्षा निम्म्या क्षमतेनेच रुग्णांना दाखल केले जाते. बेड उपलब्ध असूनही कर्मचारी नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार होवू शकत नाहीत. पालिका हद्दीत खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे जवळपास दहा हजार डॉक्टर आहेत. परंतु, हे डॉक्टर कोरोनात काम करत नाहीत, असेही बारणे यांनी सांगितले. पालिकेने ऑक्सीजन बेडची जास्तीत-जास्त उपलब्धता करावी. खासगी रुग्णालयांवर पालिकेने देखरेख ठेवावी. किती बेड शिल्लक आहेत, किती व्यापले आहेत. बिलाची जास्त आकारणी केली जात आहे का, कोरोना रुग्णांच्या तक्रारी काय आहेत. यासाठी खासगी रुग्णांलयावर नियंत्रण करण्यासाठी पालिकेच्या एका अधिका-याची नियुक्ती करावी. जेणेकरुन रुग्णाच्या नातेवाईकाला माहिती मिळेल. खासगी रुग्णालयात उपचारासाठी मदत होईल. त्याचबरोबर कंटेन्मेंट झोन कडक करावा. पालिकेने तो भाग सील करावा. याबाबत पोलीस आयुक्तांनाही सूचना दिल्या आहेत. पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन देण्याच्या निर्देश दिले आहेत.
पालिकेच्या सारथीवर रुग्णांची संख्या, त्याचे उपाय, खासगी रुग्णालयातील बेडची अद्यावत आणि परिपूर्ण माहिती द्यावी. खासगी लॅबमधील टेस्टचे रिपोर्ट थेट रुग्णाच्या हातात दिले जातात. परंतु, तसे न करता अगोदर पालिकेला त्याची माहिती मिळाली पाहिजे. रुग्णाला त्याच भागातील रुग्णालय उपलब्ध करुन देणे, क्वारंटाईन करणे, भाग कंटेन्मेंट करुन सील करणे सोपे होईल, असेही बारणे म्हणाले.
मास्क खरेदी, जेवण पुरवठ्यामध्ये गैरप्रकार करणा-या ठेकेदारांना काळ्यात यादीत टाका, अशी मागणा बारणे यांनी यावेळी केली. पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा दर्जा चांगला नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. सुविधांचाही अभाव आहे. त्याकडे जातीने लक्ष घालावे. त्याठिकाणच्या तक्रारी येवू देवू नयेत. कोविडच्या या प्रक्रियेत ठेकेदार ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ प्रकार करतात. मास्क खरेदी, जेवण पुरवठ्यामध्ये गैरव्यहार, गैरप्रकार करणा-या संस्था, ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकावे, अशा सूचना आयुक्तांना दिल्या आहेत.
खासगी रुग्णालयांच्या मनमानीबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. शहरातील खासगी रुग्णालयांच्या मनमानीबाबत मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार केला आहे.