ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ऑक्सिजन प्लांट ते हॉस्पिटल दरम्यान ‘ग्रीन कॉरिडॉर’

0
198

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा करणारे प्लांट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक ‘ऑक्सिजन कॉर्डिनेशन टीम’ तयार करण्यात आली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ऑक्सिजन वाहतुकीसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ऑक्सिजन प्लांट ते हॉस्पिटल दरम्यान ‘ग्रीन कॉरिडॉर’ देखील पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडून निर्माण केला जात आहे.

पुणे जिल्ह्यासह राज्यात आणि संबंध देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी बेड, ऑक्सिजन, आवश्यक औषधे कमी पडत आहेत. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. प्राणवायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आणि पुणे जिल्ह्यात देखील ऑक्सिजनची मोठी गरज निर्माण झाली आहे. अचानक हॉस्पिटलमधून फोन येतो आणि आमच्याकडे केवळ काही तासच पुरेल एवढा ऑक्सिजन शिल्लक आहे, असे सांगितले जाते. त्यानंतर पोलीस आणि सर्व प्रशासन धावपळ करून ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. अशा घटना हिंजवडी, वाकड येथे घडल्या आहेत. अनेक रुग्णांसाठी मागील काहो दिवसात पोलीसच देवदूत बनून आले आहेत. ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अनेक पातळ्यांवर अनेक प्रयत्न सुरू आहेत.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, “पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाबाधीत रुग्णांसाठी ऑक्सीजन पुरवठायुक्त बेड, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असलेली नऊ ठिकाणे तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडनार नाही यासाठी 24 तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

उपायुक्त सुधीर हिरेमठ पुढे म्हणाले, “ऑक्सिजन निर्मीती करणाऱ्या ऑक्सिजन प्लांटपासून हॉस्पीटलपर्यंत वाहतूक करण्यासाठी पाच शस्त्रधारी एस्कॉर्ट तसेच वाहतूक विभागाचे एस्कॉर्ट नेमण्यात आले आहे. वाहतुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून ऑक्सिजनची वाहतूक केली जात आहे.

“पुणे जिल्हयामध्ये निर्माण होणारे ‘ऑक्सीजन पुरवठा प्लांट’ हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येत आहेत. ऑक्सीजन वाहतुकीसाठी पुणे जिल्हयातील वरिष्ठ स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘ऑक्सिजन कॉर्डिनेशन टीम’ तयार करण्यात आली आहे. या टिममध्ये पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ एक आणि दोन, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, पोलीस अधिक्षक महामार्ग, पोलीस उप आयुक्त पुणे शहर, तसेच संबंधीत प्रांत अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. या टीम कडून संपूर्ण ऑक्सिजन पुरवठ्याच्या परिस्थितीवर देखरेख केली जात आहे. संबंधितांशी वेळोवेळी सुसंवाद साधला जात असून पोलीस बंदोबस्त पुरविला जात असल्याचेही हिरेमठ म्हणाले.