एसआरए च्या संमती पत्रासाठी दमदाटी करणाऱ्या गुंडांचा करणार बंदोबस्त

0
583

– लांडेवाडीतील झोपडीधारकांना पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – एसआरए प्रकल्पासाठी संमती पत्र भरून द्यावे म्हणून दमदाटी, दहशत करणाऱ्या गुंडांचा आता चोख बंदोबस्त होणार आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तसे आश्वासन लांडेवाडी (भोसरी) यथील संबंधीत झोपडीधारकांच्या शिष्टमंडळाला आज दिले.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प योजनेत खासगी विकसकामार्फत योजना राबविण्यासाठी त्या परिसरातील झोपडीधारकांची संमती पत्र भरून घेणे बंधनकारक आहे. लांडेवाडी तसेच शहरातील अन्य झोपडपट्ट्यांतूनही अशा पध्दतीची संमती पत्र घेण्यासाठी झोपडी मालकांना दमदाटी, दहशत केल्याची अनेक पर्करणे समोर आली आहेत. महापालिकेतील जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी त्याबाबत लांडेवाडी येथील झोपडीधारक महिलांचे शिष्टमंडळ घेऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली होती. कोणी अशा पध्दतीने गोरगरिबांना सक्ती करत असेल तर त्या विरोधात आपण प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदलन करू असा इशारा सिमा सावळे यानी दिला होता.

आज दुपारी याच विषयावर संबंधीत झोपडीधारकांनी थेट पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे गाऱ्हाणे केले. कशा पध्दतीने दमदाटी होते, झोपडीधारकांवर दहशत निर्माण केली जाते याबाबत सविस्तर पोलिस आयुक्तांना सांगण्यात आले. त्यावर बोलताना, घाबरू नका. कोणी गुंडाने तुम्हाला धमकावले तर थेट पोलिसांकडे तक्रार करा, आम्ही त्यांचा चोख बंदोबस्त करू असे आश्वासन पोलिस आयुक्त्यांनी दिले.