एमआयएमला सोडून महाआघाडीत सामील व्हा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आंबेडकरांना प्रस्ताव

0
770

 मुंबई, दि. २० (पीसीबी) – महाआघाडीमध्ये सामील व्हायचे असल्यास भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला बाजूला ठेवावे लागेल, अशी ठाम भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली आहे. याबाबत दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.    

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे. तर  काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर समविचारी पक्षांनी एकत्र येत केलेल्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी  त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना एमआयएमशी फारकत घेण्याची अट घालण्यात आली आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीची नुकतीच बैठक झाली. यावेळी ४० जागावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले आहे. तर ८ जागांबाबत तिढा आहे. तो सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच महाआघाडीत सहभागी होण्याबाबत आंबेडकर यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होऊ लागली आहे.