एप्रिलमध्ये वाढीव 100 एमएलडी पाणी; कडक उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी टंचाई भासणार नाही – आयुक्त पाटील

0
310

पिंपरी दि. १५(पीसीबी) – प्रशासकीय राजवटीत पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत वाढीव 100 एमएलडी पाणी मिळेल. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचे वितरण केले जाईल. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी टंचाई भासणार नाही, असा विश्वास महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. अडीचवर्षे पूर्ण होत आले. तरी, शहरवासीयांना दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. वाढीव 100 एमएलडी पाणी मिळाल्याशिवाय दररोज पाणीपुरवठा करु शकत नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती. आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चिखली येथील 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. एअरेशन फाउंटेन, क्लॅरीफ्लोक्युलेटर, फिल्टर हाऊस, शुध्द पाण्याची संपवेल इत्यादी मुख्य कामे पूर्ण झाली आहेत. महापालिका आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलणार आहे. त्या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन पाणीपुरवठा केली जाणार आहे. समाविष्ट गावांना तेथून पाणीपुरवठा केला जाईल.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.  वाढीव 100 एमएलडी पाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत वाढीव पाणी मिळेल. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाईल. तेथून त्या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातून त्या भागात होणारा पाणीपुरवठा दुसरीकडे वळविला जाईल. 100 एमएलडी पाणी आल्यास नागरिकांना पाणी टंचाई भासणार नाही”.