एजंट लोकांच्या घशात पैसे घालण्यासाठीच भूसंपादनाच्या विषयाला विरोध – महापालिकेतील सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांचा कलाटे बंधूवर थेट आरोप

0
348

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – आरक्षित जमनीचे छोटे छोटे तुकडे करुन एजंट लोकांचा सुळसुळाट रोखणेसाठी व टी.डी.आर. च्या माध्यमातुन जमिन मालकांना मोबदला मिळावा हा सत्ताधारी भाजपाचा उददेश आहे. परंतु शेतकऱ्यांच्या नावाखाली एजंट व भू माफियांच्या हिताकरिता पालिकेचे आर्थिक नुकसान करून स्वतःचे हित जोपासण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यावर केलेला हा हल्ला आहे, असा आरोप महापालिकेतील सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी केला आहे.
महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी महापालिकेतच बेदम मारहाण केली. त्यावेळी मारहाण कऱण्यामागे भूसंपादनाचा आणि धन्वंतरी योजनेचा विषय असल्याचे कलाटे यांनी सांगितले होते. त्याबाबत ढाके यांनी आज प्रसिध्दीपत्रक काढून भाजपाची भूमिका काय आहे त्याचा खुलासा केला.

प्रसिध्दीपत्रकात ढाके म्हणताता,
पिंपरी चिंचवड महापालिकेची महापालिका सभा १ जून रोजी झाली. त्यामध्ये क्रमांक १ चा विषय हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करताना संबंधित जमिन मालकास मोबदला अदा करणेबाबतचा होता. सदरचा विषय हा काल तहकूब ठेवण्यात आलेला आहे. वास्तविकत: महानगरपालिकेला विविध प्रकारची आरक्षणे विकसीत करताना खाजगी जमिनी ताब्यात घ्याव्या लागतात. खाजगी जमिनी ताब्यात घेत असताना जमिन मालकास मोठ्या प्रमाणात मोबदला अदा करावा लागतो. भूसंपादन कायद्यानुसार ३०० चौ. मी. पेक्षा जास्त जमिन असल्यास अशा जमिनीचा मोबदला वाटाघाटीने देता येत नाही. परंतु अशा वेळी आपली शक्कल लढवून एजंटामार्फत जमिनीचे छोटे छोटे तुकडे करुन महापालिकेला नुकसानीत टाकत मोठ्या प्रमाणामध्ये पालिकेला लुटण्याचा धंदा या लोकांनी सुरु केला आहे.
कलाटे बंधूनी स्वतःच्या जागा अद्यापही महापालिकेने विकासकामांसाठी भुसंपादित करूनही त्या ताब्यात दिलेल्या नाहीत. भू धारकांच्या कळवळेच्या आड लपून स्वतःचे आर्थिक हित जपत असल्याची चर्चा सर्वत्र नागरिकांमध्ये आहे. मनपाच्या तिजोरीतुन एजंट लोकांच्या घशात पैसे घालण्याचा ज्या मंडळींचा घाट आहे, तीच मंडळी या विषयाला विरोध करीत आहेत. काही ठराविक मंडळीच्या माध्यमातुन मनपाला लुटण्याचा प्रकार वाढत आहे, असे ढाके यांनी पत्रकात उघड केले आहे.

जे कलाटे बंधु या विषयाला प्रामुख्याने विरोध करीत आहेत त्यांच्याच भागात गेली १० ते १५ वर्षापासुन त्यांनी नियोजित मोठ्या रस्त्याचे काम अडवुन ठेवले आहे. त्या ठिकाणी रस्त्याची बॉटलनेक झालेली आहे. त्यामुळे एकप्रकारे त्या भागातील नागरिकांना मनपा करीत असलेल्या विकासकामांपासुन वंचित ठेवत असल्याचे स्पष्ट दिसुन येते. अशा प्रकारे अडवणूक करुन मनपाचे पैसे लुटण्याचा धंदा शिवसेना-राष्ट्रवादीचे कलाटे बंधु करीत आहे. हे सर्व धंदे थांबणार म्हणून यांची आगपाखड सुरु आहे, असा आरोप ढाके यांनी केला आहे.