एका दिवसात झालेल्या चार अपघातात चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये अडीच वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश

0
320

पिंपरी, दि.16(पीसीबी) : सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्री पर्यंत पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अपघाताच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. हे चार अपघात एमआयडीसी भोसरी, भोसरी, तळेगाव एमआयडीसी आणि वाकड परिसरात झाले आहेत.

पहिला अपघात एमआयडीसी भोसरी येथे सोमवारी (दि. 14) रात्री आठ वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात रणजीतसिंग ठाकूर (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी त्याचा मित्र महेश मैकू मोरया (वय 28, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / जी बी 4494 या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महेश आणि त्यांचा मित्र रणजीतसिंग हे दोघेजण दुचाकीवरून वजनकाटा चौकातून इंद्रायणीनगरच्या दिशेने जात होते. सेक्टर सात मधील राणे अॅक्सल कंपनीसमोर यु टर्न घेताना एका दुचाकीने महेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये रणजीतसिंग याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुसरा अपघात हवेली चौक, सदगुरूनगर भोसरी येथे मंगळवारी (दि. 15) रात्री आठ वाजता झाला. या अपघातात ज्ञानेश्वर दत्तात्रय गाडेकर (वय 45, रा. च-होली बुद्रुक, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दिलीप दत्तात्रय गाडेकर (वय 40) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कृष्णा शिवहरी नानावटे (वय 29, रा. मरकळ रोड, गणेशनगर, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी दिलीप यांचे भाऊ मयत ज्ञानेश्वर हे त्याच्या दुचाकीवरून पुणे-नाशिक रोडने जय गणेश साम्राज्य चौकाकडे जात होते. हवेली चौक, सदगुरूनगर भोसरी येथे त्यांच्या दुचाकीला एम एच 12 / एन एक्स 3332 या क्रमांकाच्या आयशर टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये ज्ञानेश्वर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक आरोपी कृष्णा घटनास्थळी न थांबता पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

तिसरा अपघात मावळ तालुक्यातील वराळे गावात मंगळवारी (दि. 15) सकाळी आठ वाजता झाला. या अपघातात श्लोक म्हस्के (वय अडीच वर्ष) या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विश्वास गंगाधर म्हस्के (रा. वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कांताप्पा गणपती गुडागर्ती (रा. वराळे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजता फिर्यादी विश्वास यांचा मुलगा श्लोक घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत खेळत होता. त्यावेळी आरोपी कांताप्पा त्याची कार (एम एच 14 / एच जी 6829) रिव्हर्स घेत होता. कार रिव्हर्स घेत असताना कारची खेळत असलेल्या श्लोकला धडक बसली. यामध्ये श्लोकच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

चौथा अपघात डांगे चौकाजवळ थेरगाव येथे मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेनऊ वाजता झाला. या अपघातात करण उर्फ काळू संदीप नखाते (वय 17, रा. थेरगाव, वाकड) या युवकाचा मृत्यू झाला आहे. सागर भीमराव जठार (वय 30, रा. मोरेश्वर कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास मयत करण त्याच्या मोपेड दुचाकीवरून डांगे चौकातून ताथवडेच्या दिशेने जात होता. सिग्नल ओलांडत असताना पिवळी नंबर प्लेट असलेल्या एका पांढऱ्या कारने करणच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये करण गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.