एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे,देवाची कृपा.. देवाची कृपा नसते आपलीच कृपा असते

0
122

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) -वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल भाष्य केलं आहे. दिवसे न् दिवस पिढी वाढते तसं शेतीत तुकडे पडतात. त्यामुळे शेतकरी अल्पभूधारक होतो. कुणी थांबायलाच तयार नाही. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण 35 कोटी होतो. आता 140 कोटी झालो आहोत. चौपट लोकसंख्या वाढली. आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे. सर्व समाजाने दोन मुलावर थांबलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. देवाची कृपा.. देवाची कृपा… काही देवाची कृपा नसते. आपलीच कृपा असते, अशी मिश्किल टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

अजित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पार पडलेल्या सभेला ते संबोधित करत होते. मराठा आरक्षणाची गेल्या 63 वर्षात कधी मागणी नव्हती. विलासराव देशमुख असताना आरक्षणाच्या मागणीने डोकं वर काढलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आरक्षण द्यायचा निर्णय झाला. आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आरक्षण दिलं. पण कोर्टात टिकलं नाही. नंतर फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

कुणबी प्रमाणपत्र द्या असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. ओबीसीत 350 जाती आहेत. कुणबीही आहेत, त्यांना आरक्षण आहे. विदर्भात देशमुखांना आरक्षण आहे. निजामशाहीतील काळातील रेकॉर्ड तपासायला सांगितलं. तोही प्रयत्न सुरू आहे. मीही मराठा समाजाचा आहे. दुसऱ्या समाजाचा नाही. मलाही समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळावं वाटतं. आमच्या मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही. पण समाजातील एका वर्गाला आरक्षणाची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

आपल्या राज्यात 52 टक्के आरक्षण आहे. आदिवासी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि भटक्यांना हे आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे आरक्षण एकूण 62 टक्के झालं. आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले. आम्हीही त्या मोर्चात असायचो. कोणताही बोर्ड नसायचा. सकल मराठा समाज या बॅनरखाली सर्व एकवटले होते, असं ते म्हणाले.

आम्ही राज्यकर्ते आहोत. आम्ही आरक्षण दिलं आणि टिकलं नाही तर लोक म्हणतील आम्हाला फसवतात. बनवतात. अशाच पद्धतीने समाजाचा दृष्टीकोण होईल. त्यामुळे दूधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पितो तसा प्रयत्न सुरू आहे. आज समजून घेण्याची मानसिकता मराठा तरुण-तरुणीची राहिली नाही. कुणालाही नाऊमेद करण्याचा आमचा प्रयत्न नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियात आमच्याबद्दल काहाही पसरवलं जातं. आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत. पण आता दिलेल्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण द्यायचं आहे. नाही तर 52 टक्के समाज बिथरेल ना, असं ते म्हणाले.