“उत्तर प्रदेशात ‘तालिबानी राज’ सुरू; भाजपच्या राज्यात पीडित कुटुंबांना भेटणं गुन्हा आहे का?”

0
446

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना लखीमपूर येथे जाण्यापासून उत्तर प्रदेशातील पोलिसांनी रोखलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात तालिबानी राज सुरू आहे. पीडित कुटुंबांना भेटणं भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का?; असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही नाना पटोले यांनी निषेध केला.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संतप्त सवाल केला. मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट यांचे सरकार आटापिटा करत आहे. तर पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन के तसेच त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत, पीडित कुटुंबियांना भेटू दिले जात नाही, असा आरोप पटोले यांनी केला.

प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जात असताना रस्त्यावर अनेक ठिकाणी अडवण्यात आले. प्रियंका गांधी यांना भारतीय जनता पक्ष व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का घाबरतात? पीडित कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का? उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अत्याचारी राजवटीला तेथील जनता कंटाळली आहे. या अत्याचारी सरकारला जनता धडा शिकवेल. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रियंकाजी गांधी यांना पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आज आंदोलन करणार आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 4 वाजता मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.