इंद्रायणीनगरात इलेक्ट्रिक डीपी स्फोट; एक मृत्युमुखी, पाच महिन्यांची चिमुरडी गंभीर जखमी

0
517

भोसरी,दि.०५(पीसीबी) – भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील राजवाड्यातील बिल्डिंग क्रमांक 3 जवळील विद्युत रोहित्राचा शनिवारी (दि. 5) दुपारी दीडच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात लागलेल्या आगीत शंभर टक्के भाजलेल्या आजीचा मृत्यू झाला, तर माय-लेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीत पाच महिन्यांच्या चिमुरडीचा समावेश आहे. जखमींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या स्फोटांमध्ये शारदा दिलीप कोतवाल (वय 51) यांचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची मुलगी हर्षदा सचिन काकडे (वय 32) या नव्वद टक्के भाजल्या आहेत. त्यांची पाच महिन्यांची मुलगी शिवानी सचिन काकडे ही सत्तर टक्के भाजली आहे. शुक्रवारी (दि. 4) इंद्रायणीनगरमधील राजवाड्यातील बिल्डिंग क्रमांक तीन जवळील विद्युत रोहित्राला संध्याकाळी सहाच्या सुमारास आग लागली होती. नागरिकांनी तक्रार केल्यावर महावितरणद्वारे हे रोहित्र मध्यरात्री बाराच्या सुमारास बदलून नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात आले.

पहाटे पाच वाजता तपासणी करून हे रोहित्र सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली. मात्र दुपारी दीडच्या सुमारास या रोहित्राचा स्फोट होऊन हा अपघात झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की आगीच्या ज्वाळा तीस फुटांपर्यंत पसरल्या. या रोहित्राजवळच राहणारे कोतवाल कुटुंबातील शारदा कोतवाल या त्यांची नात शिवानीला अंघोळ घालत होत्या. तर त्यांची मुलगी हर्षदा शेजारी बसल्या होत्या, नेमका याच वेळेस अपघात होऊन विद्युत रोहित्राचा स्फोट झाला.

दरम्म्यान विद्युत रोहित्रातील तेल स्फोटात आगीच्या ज्वाळासह जोरदार बाहेर फेकले गेले. हे तेल शारदा, हर्षदा व चिमुरडी शिवानीच्या अंगावर पडले. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघात झाल्यावर महापालिकेचे स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी स्वतः कार्यकर्त्यांसह जखमींना ससून रुग्णालयात जाऊन दाखल केले.