इंडिया आघाडीत बिघाडी , नितीश कुमार नाराज

0
78

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये पार पाडली. आघाडीच्या २८ पक्षांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला. नरेंद्र मोदींच्या विरोधात एकीच्या गोष्टी करणाऱ्याआघाडीच्या बैठकीत मात्र नाराजी नाट्य रंगले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. खर्गे यांनी उमेदवार होण्यास नकार दिला. मात्र, या सगळ्यातआघाडीचे समन्वय म्हणून आपली निवड होईल म्हणून अपेक्षा असणारे नितीश कुमार मात्र नाराज झाल्याची चर्चा आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला न थांबता लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे दोघे आपल्या हाॅटेलमध्ये निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडिया आघाडीच्या पहिल्या बैठकीपासूनच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून निवड केली जावी,अशी मागणी जनता दल पक्षाकडून करण्यात येत होती. दिल्लीत झालेल्या बैठकीच्या दिवशी देखील नितीश कुमार यांचे समन्वयक पदी निवड करण्यासाठीचे पोस्टर दिल्लीत लागले होते. मात्र, बैठकीत समन्वयक पदाबाबत चर्चाच झाली नाही. त्यात थेट ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सुचवले.