आषाढी पालखी सोहळा वीस वारकऱ्यांसोबत ? पायी वारीला फाटा, दिंड्याही नसतील , आळंदीच्या ग्रामस्थांनी पंढरपूर देवस्थानला सुचविला पर्याय

0
571

पिंपरी, दि. १० (पीसीबी) : कोरोनाचे सावट असल्याने यंदाची आषाढी वारी फक्त २० वारकऱ्यांना सोबत घेऊन वाहनातून आळंदी ते थेट पंढरपूर नेण्याचा पर्याय आळंदीच्या ग्रामस्थांनी पंढरपूर देवस्थानला सुचविला आहे. याचाच अर्थ यंदाची वारी पायी नसेल, पुढे मागे दिंड्या पताकांचा भारसुध्दा नसेल, असे दिसते.

पालखी सोहळा वद्य अष्टमी म्हणजेच 13 जून रोजी करु नका, त्याऐवजी थेट आषाढ शुद्ध दशमी म्हणजे 30 जून रोजी मोजक्या वीस वारकऱ्यांसोबत माऊलींची पालखी पंढरपूरला न्या, असा पर्याय आळंदीच्या ग्रामस्थांकडून सुचवण्यात आला आहे. आळंदीच्या रहिवाशांनी सह्यांचे निवेदन पंढरपूर देवस्थानला दिले आहे. सोहळा वाटेत कोठेही न थांबता थेट पंढपूरला न्या, अशी सूचनाही करण्यात आली आहे. याचाच दुसरा अर्थ एखाद्या वाहनातून अथवा हवाई मार्गाने पालखी पंढरपूरला न्यायची आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा आळंदीला आणायची असे घाटत आहे.
सरकारच्या नियमानुसार आषाढी एकादशीला (1 जुलै) प्रदक्षिणा, द्वादशीचे पारणे फेडून पालखी पुन्हा आळंदीकडे मार्गस्थ करावी, असा पर्यायही निवेदनात सुचवण्यात आला आहे.

महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे दरवर्षी मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र, या वर्षी पंढरपूर वारीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे वारकऱ्यांनीही घरुनच पंढरीच्या विठुरायाला नमस्कार करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे. सोहळ्यात पालखी सोहळा मालक, प्रमुख विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख, चोपदार, मानकरी, शिपाई, दिंडीकरी, विणेकरी, टाळकरी, पखवाद वादक, झेंडेकरी, तुळस घेणारी महिला वारकरी आणि पुजारी अशा मोजक्याच लोकांचा सहभाग असावा. माऊलींच्या पादुका ट्रकमधे किंवा सजवलेल्या रथात ठेवाव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अद्याप शासकीय स्तरावर याबाबतची बैठक होणार आहे. त्यानंतरच पालखी सोहळ्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले.