आशा भोसले पुरस्काराचे मानकरी डॉ. सलील कुलकर्णी

0
206

 

रविवारी सायंकाळी चिंचवडमध्ये आशा भोसले पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन…..

पिंपरी,दि. ७ (पीसीबी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठानच्या वतीने देशातील लक्षणीय प्रसिद्ध पार्श्वगायक यांना देण्यात येणारा आणि सिद्धिविनायक ग्रुप पुरस्कृत आशा भोसले पुरस्कार डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
पार्श्वगायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी हे एकोणिसाव्या आशा भोसले पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. रविवारी (दि.८ मे ) सायंकाळी ५:३० वाजता चिंचवड, उद्योग नगर येथील कामगार कल्याण मैदान येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे.
तसेच यावेळी संगीत क्षेत्रात राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांचा विशेष नागरी सत्कार होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
ज्येष्ठ लोकनेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते २५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते.
यापूर्वी अनेक नामवंत कलाकारांना आशा भोसले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, राजेशकुमार साकला यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य राजू बंग, किरण येवलेकर, नरेंद्र आमले, सुहास
जोशी, प्रकाश जगताप, बाळ जुवाटकर, गौरी लोंढे, संजीवनी पांडे, संतोष पाटील, संतोष शिंदे, संतोष रासने, जयराज काळे, कीर्ति मटंगे, सल्लागार विजय जोशी, हेमेंद्रभाई शहा, राजाभाऊ गोलांडे आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात भाग घेतला आहे.
यावेळी प्रसिद्ध पार्श्वगायिका आशाताई व डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गाजलेल्या गीतांवर आधारित मधुमिता निर्मित “रजनीगंधा” हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे अशीही माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.