आळंदीत टेम्पो चालकाने फरफरट नेल्याने पोलिस गंभीर जखमी

0
1023

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – विरुध्द दिशेने येणाऱ्या एका टेम्पो चालकाला थांबवून त्याच्यावर कारवाई करत असताना टेम्पोचालकाने वाहतूक शाखेतील पोलिसाला रस्त्यावरुन फरफटत नेत गंभीर जखमी केले. या घटनेत पोलिसाच्या दोन्ही हातांनासह छातीला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना शनिवारी (दि.५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडगाव घेनंद चौकात घडली.

श्रीकृष्णा जनार्धन म्हेत्रे असे जखमी झालेल्या आळंदी दिघी वाहतूक शाखेतील सहायक पोलीस फौदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पोचालक किसन हरीभाऊ दौंडकर (वय ३५, रा. संगमवाडी, काळुस) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सहायक पोलीस फौदार श्रीकृष्णा म्हेत्रे यांची आळंदी दिघी वाहतूक शाखेत नेमुक आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते वडगाव घेनंद चौकात वाहतूक नियमन करत होते. यावेळी विरुध्द दिशेने येणारा टेम्पो (क्र.एमएच/१४/ईएम/७७२६) त्यांनी थांबला. तो टेम्पो किसन दौंडकर चालवत होते. यावर कारवाई करण्यासाठी श्रीकृष्णा यांनी टेम्पो वाहतूक कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले आणि टेम्पोमध्ये बसत होते. यावर किसन याने टेम्पो पळवला यामुळे श्रीकृष्णा रोडवरुन काही अंतरावर फरफटत गेले. त्यामध्ये त्यांच्या छातीला आणि दोन्ही हातांना जखमा होऊन ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.  पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.