आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजात नाराजी; राज्यशासन आरक्षणासाठी बाजू मांडण्यात कमी पडल्याचा आरोप

0
214

औरंगाबाद, दि.०६ (पीसीबी) : काल सुप्रीम कोर्टाने अखेरचा निर्णय देत मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द ठरवल्यानंतर यामध्ये राज्य शासन आरक्षणासाठी बाजू मांडण्यात कमी पडल्याचा आरोप करत मराठवाडय़ात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मराठा समाजातील तरुण आक्रमक झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांमध्ये पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांकडून औरंगाबादेत कायगाव टोका परिसरात बुधवारी मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. दोन वर्षांपूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब या तरुणाने जलसमाधी घेतली होती. त्या पाश्र्वभूमीवर पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक कंपनी सिल्लोड, पैठण आणि गंगापूर भागात तैनात केली आहे. दंगल नियंत्रक पोलीस दलाच्या चार तुकडय़ा तैनात आहेत. कायगाव टोका भागातही एक तुकडी दंगल नियंत्रक पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आहे. याशिवाय गंगापूरचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुख्यालयातीलही काही कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. औरंगाबादेत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने बुधवारी क्रांती चौकात रमेश केरे पाटील व आप्पासाहेब कुढेकर यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत घातली. मात्र, आंदोलक ऐकत नसल्याचे पाहून त्यांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले.

उस्मानाबादेतही आंदोलन करण्यात आले. न्यायालयाच्या निकालाचा आदर करत ‘निकाल लागला, परंतु समाजाला न्याय मिळाला नाही’, अशी प्रतिक्रिया नाराज असलेल्या मराठा समाजबांधवांतून व्यक्त होत आहे. दरम्यान नाराज समाजाची समजूत घालण्यासाठी विविध नेते समोर आले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी समाजाला त्यांच्या हक्काचे व न्याय्य असलेले आरक्षण मिळेपर्यंत मी माझ्या स्तरावरून पाठपुरावा करत राहीन, या निकालाच्या अनुषंगाने मराठा समाजबांधवांनीही संयम बाळगावा, अशी विनंती त्यांनी केली. अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षणामध्ये येणाऱ्या सवलती देण्यात याव्यात, असे मत जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले यांनी व्यक्त केले. समाजाची फसवणूक झाल्याची प्रतिक्रिया डॉ. धीरज वीर यांनी व्यक्त केली. समाजाच्या आरक्षणासाठी देशातील सर्वपक्षीयांनी प्रयत्न करावेत, असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी व्यक्त केले.