आयकर विभागाची कारवाई सूडबुध्दीनेच

0
271

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) : अनेक मुद्द्यांवरुन सातत्याने केंद्र सरकारविरोधी भूमिका मांडल्यामुळे कायमच चर्चेत असणारा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरांवर आज आयकर विभागाने छापे घातले आङेत. आयकर विभागाने या दोघांच्याही मुंबईमधील मालमत्तावर छापे टाकत तपास सुरु केला आहे. या दोघांव्यतिरिक्त एकूण २० जणांच्याविरोधात आयकर विभागाने छापे टाकत तपास सुरु केल्याचे वृत्त आहे. यामध्ये विकास बहल आणि मधु मंटेनासारख्या व्यक्तींचाही समावेश आहे. आयकर विभागाच्या या कारवाईची चर्चा सोशल नेटवर्किंगवरही आहे. Income Tax हा ट्विटरवरील टॉप ट्रेण्ड असून अनेकांची अचानक अनुराग आणि तापसीवर झालेल्या या कारवाईसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. तर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी तर अशाप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर यापूर्वीही कधीही करण्यात आला नव्हता असा टोला मोदी सरकारला लगावला आहे.

प्रशांत भूषण यांनी अनुराग आणि तापसीविरोधात आयकर विभागने केलेल्या कारवाईची बातमी शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाची ए टीम कामाला लागली आहे. आपल्या इच्छेप्रमाणे न वागणाऱ्यांना त्रास द्या, धमकवा आणि गप्प करा. भारताने अशाप्रकारे सूड बुद्धीने आयकर विभाग, सक्तवसुली संचलनालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेचा वापर यापूर्वी कधीही पाहिला नाही, अशा अर्थाचं ट्विट भूषण यांनी केलं आहे.

आयकर विभागाने दुपारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मुंबईमधील मालमत्तांवर छापे मारले. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या छापे टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’च्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.