आमदार लक्ष्मण जगताप यांचा तिसरा लेटरबाँम्ब – सत्ताधारी आमदारांनीच विकास कामांबद्दल आक्षेप घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

0
277

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेतील विविध विकास कामांबद्दल पत्रांचा धडाका लावला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने कंत्राटी सुरक्षा रक्षक, वार्डन नियुक्तीसाठी प्रसिद्ध केलेलीली निविदा विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून काढल्याचे दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निविदेतील अटी-शर्तीत बदल करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, महापालिकेतील सत्ताधारी भाजपचेच आमदार स्वतःच विकास कामांबद्दल शंका घेत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ आहे.

महापालिकेच्या शहरात विविध मिळकती आहेत. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाते. तसेच शहरातील वाहतूक सुरक्षेसाठी वार्डनची नेमणूक केली जाते.

पालिकेच्या सुरक्षा विभागाने पालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळासाठी रखवालदारांच्या मदतीकरिता मदतनीस आणि वर्दळीच्या चौकात वाहतूक सुरळीत करण्याकरिता ठेकेदारी पद्धतीने वार्डन नेण्यासाठी निविदा काढली आहे. विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर काढल्याचे दिसून येते. अनुभवाची अट व शासकीय, निमशासकीय यंत्रणेत केलेल्या कामाचे अनुभवाच्या अटींची आणि आर्थिक उलाढालीबाबत अटी-शर्तींची योग्य तपासणी करण्यात यावी. त्यात बदल करावेत. जेणेकरून निविदा भरण्यास स्पर्धा होईल, असे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

या निविदा सुरक्षा विभागामार्फत एकत्रित काढण्यात आल्या आहेत. त्याऐवजी महापालिकेच्या आठ कार्यालयाकरिता स्वतंत्र निविदा काढण्यात यावी. स्पर्धात्मक निविदा भरल्याने पालिकेचे आर्थिक हित साधले जाईल, असे आमदार जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, आमदार जगताप यांनी यापुर्वी पंधरा दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त यांना विविध २६ मुद्यांवर माहिती मागविणारे पत्र दिले होते. त्यानंतर पुन्हा काही निविदांबद्दलची माहिती त्यांनी मागितली. आता तिसरे पत्र दिल्याने महापालिका प्रशासनसुध्दा संभ्रमात पडले आहे. नियम डावलून एकही काम करणार नाही, अशी महापालिका आयुक्तांची ठोस भुमिका आहे. आयुक्तांना विरोध करण्यासाठी आमदारांचा पत्र प्रपंच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.