आमदार महेश लांडगे यांच्याकडून पोलीस अधिका-यांसमोर जीवे मारण्याची धमकी

0
1187
  • भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांचा आरोप

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – शहर दौ-यावर असलेले (BJP) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेडझोन संरक्षण क्षेत्रातील बाधित बांधकामांवरील स्थगिती आदेश उठविण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेलो असता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मला कार्यक्रम स्थळावरुन हाकलून दिले. पोलीस अधिका-यांसमोर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केला आहे. दरम्यान, हे सर्व आरोप खोटे असल्याचा निर्वाळा आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले आहे. त्यात काळभोर यांनी म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाच्या वतीने चिखलीतील सोनवणे वस्ती 1, 16 टाऊन हॉल येथे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निगडीतील सेक्टर 22 जवाहरलाल नेहरु पुनर्वसन योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्प स्थगिती आदेश उठविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी आमदार महेश लांडगे मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे होते.

मी आतमध्ये जात असताना आमदार लांडगे यांनी मला पोलीस अधिकारी, कर्मचा-यांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली. कार्यक्रम स्थळावरुन हाकलून दिले. चिखली पोलिस कर्मचारी यांनी वेळीच हस्तक्षेप करून आमदार लांडगे व त्यांच्या समर्थक कार्यकर्ते यांच्यापासून माझी सुखरूप सुटका करून पोलीस व्हॅन मध्ये बसवून माझ्या घरी सोडले. अन्यथा मला कार्यक्रम स्थळीच जीवे मारण्याचा (BJP) प्रयत्न झाला असता. भविष्यात आमदार लांडगे, त्यांचे बंधू कार्तिक लांडगे, सचिन लांडगे यांच्यापासून माझ्या जिवीतास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्यावर्षी आमदार लांडगे यांनी इंद्रायणीथडी भोसरीत भरविली होती. त्यावेळी मी प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्याची खुन्नस ठेऊन आमदार लांडगे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मला गराडा घातला होता. पोलिसांमुळे माझे प्राण वाचले. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. आमदार लांडगे, त्यांच्या समर्थकांकडून माझ्या जीवाला, तसेच कुटुंबियांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्यात यावे. आमदार लांडगे यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी काळभोर यांनी निवेदनातून केली आहे.

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, काळभोर यांचा स्वभाव कसा आहे हे सर्वांना माहिती आहे. मी काही बोललो नाही. धमकी दिलेली नाही. मी सर्वांसोबत फिरतो, उठतो बसतो.