मुंबई, दि. १८ (पीसीबी) : आमच्या हातात ईडी-सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला आहे. फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.
राऊत म्हणाले, “ज्या दिवशी आमच्या हातामध्ये केंद्रात ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं, त्यावेळी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नसेल. लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहितीए. त्यांनाच माहितीए असं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा”
फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “हे बिनपरिवाराचे आहेत का? यांना पोरंबाळं झाली नाहीत का? का दुसऱ्यांची पळवली आहेत. भाजप हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाहीत त्यामुळं ते आमची पोरं फोडून घेऊन बसले आहेत. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या पोरांचे पाळणे हालवायला पाहिजेत, दुसऱ्यांच्या पोरांचे नाही, नाहीतर ते पुन्हा पळून जातील”