आमच्यासोबत चर्चेशिवाय राष्ट्रवादीचे विलिनीकरण करता येणार नाही; उदयनराजे आक्रमक

0
413

अहमदनगर, दि. १ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेबाबत राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता, उदयनराजे नाराज झाले. ते म्हणाले की आमच्यासोबत (राष्ट्रवादीचे नेते, आमदार, खासदार) चर्चा केल्याशिवाय पक्षाचे विलिनीकरण करता येणार नाही.

अहमनदनगरमधील चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त (शुक्रवार, 31 मे)त्यांना अभिवादन करण्यासाठी उदयनराजे भोसले आले होते. येथे आयोजित जयंतीच्या कार्यक्रमानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रतिक्रिया दिली.

उदयनराजे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल मला काहीच माहिती नाही. विलिनीकरणाबाबत माझ्याशी आणि इतर नेत्यांशी चर्चा करावी लागेल. योग्य ती चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. असा परस्पर निर्णय घेता येणार नाही.

उदयनराजे एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, विलिनीकरणाबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. पक्षाचे विलिनीकरण का करायचे आहे? हे आम्हाला सांगितले पाहिजे. विलिनीकरण करण्याचे ठरवले, तर कोणत्या पक्षात विलिनीकरण करायचे हेदेखील पक्षातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन ठरवायला हवे.