‘आमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही’ हा भाजपचा भ्रम आम्ही संपवला – शंकरराव गडाख

0
454

अहमदनगर,दि.२५(पीसीबी) – एवढ्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हे भाजपच्या कल्पनेपलिकडचं आहे. आमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही असा भाजपचा भ्रम होता आणि तो महाविकासआघाडीच्या प्रयोगाने संपला आहे असं राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“एक महिन्यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चर्चा सुरु होती. आज ही चर्चा दुसरीकडेच भरकटली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करण्याचा प्रयत्न केला. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. कोर्टाचा जो निर्णय व्हायचा तो होईल, पण यात दुर्दैवाने राजकारण केलं जातंय. एकत्रित येऊन कोरोनाशी लढण्यासाठी जे सहकार्य विरोधी पक्षांचं हवं होतं ते म्हणावं तसं मिळत नाही. लोकांचं लक्ष विचलित केलं जातंय.” असंही गडाख म्हणाले आहेत.

दरम्यान “विरोधकांकडून आगपाखड सुरु आहे कारण हे सर्व पक्ष एकत्रित येऊ शकतील हे त्यांच्या कल्पने पलिकडचं होतं. असे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यांना वाटत होतं आमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही. त्यांच्या या समजाला तडे जात आहेत. त्यामुळेच ते असे छोटे मोठे प्रकरणं फार मोठे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असंही ते म्हणाले.