आपीओ ला मोठा प्रतिसाद मिळालेल्या झोमॅटोला पहिल्या तिमाहीत कोट्यवधींचा तोटा

0
194

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटोला पहिल्या तिमाहीत तब्बल 359 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 99.8 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीच्या उत्पन्नापेक्षा खर्चात झालेली वाढ हे कारण या तोट्यामागे असल्याचं झोमॅटोने स्पष्ट केलं आहे. गेल्याच महिन्यात झोमॅटोने स्टॉक मार्केटमध्ये आपले IPO आणले होते, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

कंपनीने Employee Stock Ownership Plan (ESOP 2021) ही स्कीम बाजारात आणल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्यामुळे पहिल्या तिमाहीत आपल्याला तोट्याला सामोरं जावं लागलं आहे असं झोमॅटोने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.

झोमॅटोने जारी केलेल्या निवेदनानुसार, कंपनीला या तिमाहीत 844.4 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. पण या तिमाहीत कंपनीच्या खर्चात 1,259.7 कोटी रुपयांची वाढ झाल्यामुळे हा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी हाच महसूल 266 कोटी रुपये इतका होता.

झोमॅटो एक रेस्टॉरंट अॅग्रिगेटर आहे. या कंपनीकडून ग्राहकांना रेस्टॉरंटमधून फूड डिलिव्हर केलं जातं. तसेच या हॉटेल आणि रेस्टॉरंटचे रिव्ह्यूदेखील दिले जातात, त्यांचं मार्केटिंग केलं जातं. या कंपनीचा कोणताही प्रमोटर नाही. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये इन्फो एज, अॅन्ट फायनान्शियल आणि उबेरचा समावेश आहे.

गेल्या वर्षी झोमॅटोच्या महसूलात 96 टक्क्यांची वृद्धी झाली होती. सन 2019 साली झोमॅटोचा महसूल हा 1398 कोटी रुपये इतका होता. गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली त्यामध्ये वाढ होऊन तो 2743 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी झोमॅटोला 403 मिलियन ऑनलाईन ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्याचा आकडेवारीत हिशोब केला तर तो 11,221 कोटी रुपये इतका आहे. गेल्या वर्षी झोमॅटोने दोन लाख डिलिव्हरी पार्टनर्सच्या माध्यमातून भारतभरात जवळपास 500 शहरांत फूड डिलिव्हरी केली होती.