“आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव”; ठाकरे सरकारला मनसेचा खोचक टोला

0
241

मुंबई, दि.२३(पीसीबी) : रविवारी रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत आणि अनलॉकबाबत बोलताना जनतेला अधिक सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. या संबोधनात करोनासोबतच राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवरही मुख्यमंत्री भाष्य करतील अशी जनतेची अपेक्षा होती, मात्र या विषयांवर बोलणं मुख्यमंत्री ठाकरे यांनी टाळलं. त्यामुळे त्यांच्या रविवारच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केलेल्या संबोधनावर अनेकांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

“ठाकरे यांच्या भाषणात विविध विषयांचा समावेश हवा होता, पण तसं न घडल्याने मुख्यमंत्र्यांनी अपेक्षाभंग केला, असे मत काही भाजपा नेत्यांकडून व्यक्त करण्यात आले. याच मुद्द्यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दात टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडून आम्हाला काहीही अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे रविवारच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अजिबात अपेक्षाभंग झाला नाही, असा टोमणा मारत, ‘आपला मुख्यमंत्री, आपले दुर्दैव’, असं ट्विट त्यांनी केलं.”

“नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण हे निराश करणारे होते. जनतेच्या नाराजीची दखल न घेतां मुख्यमंत्र्यांनी जनतेवरच नाराजी व्यक्त केली. वीजबिलाबाबतचा प्रश्न चर्चेत असताना त्यावर काहीही दिलासा देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांना काही मदत नाही. तसेच, राज्यातील समस्यांवर काही उपाय नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ना ठोस कृती ना उपाय”, असं ट्विट करत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मुख्यमंत्र्यांच्या संबोधनावर टीका केली.