आनेवाडी टोलनाका आंदोलनप्रकरणी आमदार शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल

0
345

सातारा,दि.२२(पीसीबी) – साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तीन दिवसांपूर्वी (१८ डिसेंबर) आंदोलन करुन पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याजवळचा आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. या आंदोलनप्रकरणी शिवेंद्रराजे आणि त्यांच्या ८० कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुईंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम दिलेला असूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी आक्रमक होऊन आंदोलन केले. तसेच त्यांनी आनेवाडी टोलनाका बंद पाडला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्याजवळ आनेवाडी येथे हा टोलनाका आहे. पुणे साताऱ्यादरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्याचबरोबर या महामार्गावर रस्ते विकास महामंडळाकडून प्रवाशांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. टोल प्रशासनाकडूनही कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. प्रसाधनगृहांअभावी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे, असे दावे शिवेंद्रराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीन दिवसांपूर्वी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.

एकीकडे प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाहीत, मात्र दुसऱ्या बाजूला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात टोलवसुली केली जात आहे. त्यामुळे १५ दिवसांच्या आत प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवा, खड्डे बुजवा नाहीतर टोल बंद पाडू असा अल्टिमेटम शिवेंद्रराजेंनी १५ दिवसांपूर्वी दिला होता. परंतु १५ दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही कार्यवाहा केली नाही. परिणामी शिवेंद्रराजेंना आंदोलन करावे लागले.