आधी वडिलांचे स्मारक बांधा, मग राम मंदिर बांधा; अजित पवारांचा उध्दव ठाकरेंना टोला  

0
968

पुणे, दि. २२ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आधी वडिलांचे स्मारक बांधावे. तरच ते राम मंदिर बांधतील, याची खात्री लोकांना पटेल, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.   

राष्ट्रवादीच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन  करण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, आगामी निवडणुकां डोळ्यासमोर राम मंदिराचे राजकारण  केले जात आहे. गेली  चार वर्षे शिवसेनेला या विषयावर बोलण्यास कोणी  रोखले होते का? जनतेला भावनिक केले जात आहे.  जातीय तेढ निर्माण करून जातीय विष पेरण्याचे काम या पक्षांकडून सुरू आहे, असे पवार म्हणाले.

अयोध्येमध्ये  शिवसेनेचे  अस्तित्व कोठे दिसत आहे का?  तिथे मंदिर बांधण्यासाठी  कोण  पुढे येणार आहे ? आपला पक्ष कुठे अस्तित्वात आहे, हे आधी पाहावे. त्यानंतर त्या विषयावर बोलावे. उध्दव ठाकरे यांच्या मध्ये धमक असेल तर त्यांनी राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे आव्हान पवारांनी दिले.

सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठी टाळाटाळ  करत  आहे. सरकारने ३१ ऑक्टोबररोजी दुष्काळ जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, कोणतेही  कारण नसताना त्यास विलंब लावला जात आहे. कर्नाटकामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मग महाराष्ट्रात  का केला जात  नाही, असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.