आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार

0
533

– संभाजीराजे यांचे समर्थकाही प्रचंड आक्रमक, सोशल मीडिया द्वारे इशारा

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा जाहीर न केल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांना मराठा संघटनांचा भक्कम पाठिंबा आहे. या संघटनांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेतील उमेदवारीसाठी अगोदरच मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे संभाजीराजे यांचे समर्थकाही प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवत संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा नाकारल्यानंतर मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या संभाजीराजे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले जात आहे. हे पोस्टर अल्पावधीत व्हायरल झाले आहे. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार, असा मजकूर या पोस्टरवर लिहला आहे. या माध्यमातून संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेना आणि महाविकासआघाडीला एकप्रकारे इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांच्याशी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरात शिरू, असा इशाराही मराठा संघटनांकडून देण्यात आला होता. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान, कालपासून राज्याच्या विविध भागांमधील मराठा संघटनांचे समन्वयक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांचे कार्यकर्ते आणि समर्थक कालपासूनच मुंबईत तळ ठोकून आहेत. आता मराठा संघटनांचे सर्व समन्वयक मुंबईत दाखल झाल्यानंतर एकत्र बसून आगामी रणनीती आखली जाईल. शिवसेनेने अद्याप सहाव्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. आज शिवसेनेकडून यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका जाहीर करू शकतात. तर मराठा समन्वयक आणि संभाजीराजे यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.