आता माजी आमदारांचाही एकनाथ शिंदे गटाकडे ओढा

0
303

सोलापूर, दि. २८ (पीसीबी) : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार सांगोल्याचे ॲड. शहाजीबापू पाटील हे बंडखोरांच्या कळपात गेल्यानंतर आता जिल्ह्यातील सेनेचे बहुतांशी माजी आमदारांचा ओढाही पक्षाचे शिवबंधन बाजूला ठेवत एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याकडे आहे. यापैकी करमाळ्याचे नारायण पाटील यांनी त्या दिशेने पाऊलही टाकले आहे. तर काही माजी आमदार सध्या कुंपणावर असल्याचे दिसून येते. राज्यातील शिवसेनेच्या ४० आमदारांनंतर १९ पैकी १२ खासदार शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता अनेक माजी आमदारसुध्दा ठाकरे यांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याने मोठी शिवसेनेत खळबळ आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत काही मंडळींनी जाणीवपूर्वक आपल्याविषयी पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती दिल्यामुळे आपले तिकीट कापले गेले. त्यामुळे शिवसेनेशी आपला संबंध राहिला नाही. मात्र राज्य पातळीवर एकनाथ शिंदे गटाबरोबर तर स्थानिक पातळीवर मोहिते-पाटील गटाच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून मागील माढा विधानसभा निवडणूक लढविलेले संजय कोकाटे यांनीही एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मागील करमाळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या रश्मी दिगंबर बागल यांची माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी भेट घेऊन खालबते केली. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रश्मी बागल शिवसेनेत सक्रीय दिसत नाहीत.

मागील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने सध्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले माजी मंत्री तानाजी सावंत यांना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी स्वतःचे राजकीय वजन वापरून सावंत यांनी जिल्ह्यात पक्षांतर्गत पकड बसविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मर्जीतील उमेदवार आणले होते. यात करमाळ्याचे तत्कालीन आमदार नारायण पाटील यांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून आयात झालेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. तसेच सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मूळ दावेदार महेश कोठे यांचा पत्ता ऐनवेळी कापून शेवटच्या क्षणी दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने यांना सेनेत प्रवेश देत उमेदवारीही दिली होती. बार्शीत राष्ट्रवादीचे,माजी मंत्री दिलीप सोपल यांनाही शिवसेनेने शिवबंधन बांधून विधानसभेची उमेदवारी दिली होती. तर माढ्यात भाजपचे संजय कोकाटे यांना शिवसेनेत प्रवेश देत विधानसभेचेही तिकीट तानाजी सावंत यांनीच मिळवून दिले होते. परंतु या सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला. यात सावंत यांचे गणित चुकल्यामुळे त्यांची शिवसेनेत उलटी गणती सुरू झाली.

करमाळा विधानसभा निवडणुकीत आपण विद्यमान आमदार असूनही केवळ तानाजी सावंत यांच्यामुळे आपली उमेदवारी कापण्यात आल्याचा आरोप करीत माजी आमदार नारायण पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. परंतु सध्या राज्यातील बदलत्या राजकारणात तानाजी सावंत यांच्यावर असलेला राग नारायण पाटील हे विसरल्याचे दिसून येत आहे. माढ्याचे संजय कोकाटे यांनीही शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर असलेली सलगी तोडावी आणि निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्याची भूमिका अंगिकारावी, अशी मागणी करीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सुरात सूर मिसळला आहे. तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा कोकाटे यांनी निषेधही केला आहे. कोकाटे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि मोहिते-पाटील गटाचे मानले जातात.

सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविलेले माजी आमदार दिलीप माने यांनीही शिवसेनेपासून दूर राहून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. बदलत्या राजकीय परिस्थितीत माने हे खरोखरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार की सत्ताकारणाची दिशा पाहून आणखी वेगळी भूमिका घेणार, हे गुलदस्त्यात आहे. बार्शीचे दिलीप सोपल हेही कुंपणावर बसल्याचे सांगितले जाते. २००४ साली दक्षिण सोलापूर विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आलेले माजी आमदार रतिकांत पाटील हे सेनेत सक्रीय नाहीत. सध्याही त्यांची भूमिका नरो वा कुंजरोवा अशीच असल्याचे दिसून येते.