आता मनसेची ईडीला नोटीस; शासकीय नियमाचे केले उल्लंघन

0
665

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीची नोटीस मिळाली की बऱ्याच नेत्यांची तंतरते. या ईडीच्या विरोधात कोणी फार काही बोलत नाही आणि करतही नाही. मात्र या ईडीला आपल्या भाषेत नोटीस बजावण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाली आहे. या ईडीने राज्य शासनाच्या एक नियमभंग केल्याबद्दल मनसेने मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची काल ईडीने चौकशी केली. त्यावरून मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला. मात्र आंदोलन करण्याचे टाळले. त्यांना आता एक कायदेशीर मुद्दा मिळाला आहे. मुंबईत ईडीच्या कार्यालयाचा नामफलक हिंदी आणि इंग्रजीत आहे. शासकीय नियमानुसार स्थानिक भाषेत म्हणजे मराठीतही हा फलक असायला हवा. सर्व शासकीय कार्यालयांना तशी सक्ती आहे. मात्र ईडीने त्याचे सरळसऱळ उल्लंघन केले आहे. तसे न केल्यास दंडाचीही तरतूद आहे. याबाबत मनसेने मराठी भाषा विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच ईडीलाही त्याची प्रत पाठविली आहे.